बुलेट ट्रेनच्या तोडीस तोड असा १ लाख कोटी रूपयांचा आणि १२ तासात मुंबई ते दिल्ली अंतर कापणा-या भव्य द्रूतगती महामार्गाचं काम लवकरच सुरू केलं जाईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. जिल्ह्यातील ८ जेटींच्या कामांसाठी १०० कोटी रूपये मंजूर केल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. भिवंडीजवळील दिवे-अंजूर गावात जेटीच्या पायाभरणीचा सोहळा गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ठाणे-वसई या पहिल्या टप्प्यास १२०० कोटींची मंजुरी दिली असून त्यापैकी सव्वापाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या वाहतुकीचं भूमीपूजन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबई ते दिल्ली हा द्रूतगती महामार्ग बारा पदरी असून तो भिवंडीतूनही जाणार आहे. वडोदरा ते मुंबई या टप्प्यासाठी ४४ हजार कोटींच्या निविदेस मंजुरी मिळाली असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.
