हिंदू विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानानं मांडण्याची सुवर्णसंधी आर. व्ही. एस. मणी यांच्या दि मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकानं दिली आहे असं प्रतिपादन प्राध्यापक अशोक मोडक यांनी केलं. दिनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित हिंदू दहशतवाद नावाचं थोतांड या परिसंवादात ते बोलत होते. मणी यांनी हे पुस्तक लिहून हिंदू दहशतवाद विरोधी कुभांड हाणून पाडलं आहे. त्यामुळं या पुस्तकाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे असं मोडक यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी पुरोगाम्यांचा समाचार घेताना बुध्दीवंतांची पोलखोल केली. समाजाच्या श्रध्दा ढासळून टाकण्याचे संघटित प्रयत्न गेली ७० वर्ष सुरू आहेत. देशाविषयी आपली भूमिका महत्वाची आहे. आम्ही बांधू ते तोरण आम्ही सांगू ते धोरण हे पुरोगामित्व पराभूत करण्यासाठी सक्रीय होण्याची गरज भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला हिंदू दहशतवादाची प्रयोगशाळा करण्याचे कारस्थान होते. हिंदू दहशतवादाचे बीज जाणिवपूर्वक रूजवण्याचे प्रयत्न झाले. २००६ च्या नांदेड स्फोटापासून ते २६/११ पर्यंतच्या तपासापर्यंत धादांत खोटे कुभांड रचण्याचा कट तत्कालीन गृहमंत्र्यांसह अनेक राजकीय उच्चपदस्थांनी रचला होता असे सांगून त्याची सविस्तर माहिती या पुस्तकाचे लेखक आणि माजी अप्पर केंद्रीय गृहसचिव आर. व्ही. एस. मणी यांनी दिली.
