हद्दीच्या वादात अडकलेल्या कुटुंबियांच्या घरात ३० वर्षांनी वीज

मुलुंड हद्दीच्या वादात अडकलेल्या त्या वस्तीत आमदार संजय केळकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे ३० वर्षांनी दिवा पेटू शकला आहे. ऐन दिवाळीच्या सणात घरी दिवा लागल्यानं त्या २० कुटुंबांच्या चेह-यावर आनंद उमटला होता. आमदार संजय केळकर यांनी माणुसकीचा धागा जोडत जिल्हा प्रशासन आणि महावितरणकडे पाठपुरावा करून येथील कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे. ठाण्यातील कशिश पार्क येथील जुना तबेला बंजारा वस्तीजवळ वीसएक कुटुंब गेल्या ३०-३५ वर्षांपासून राहत आहेत. पण ही वस्ती मुंबईच्या हद्दीतील आहे का ठाण्याच्या हद्दीतील आहे याचा वाद सुरू असल्यानं ही कुटुंबं तीन दशकं मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहिली आहेत. काहीही पुरावे नसल्यानं त्यांना वीज जोडणीही मिळत नव्हती. आपल्याला मुलभूत सुविधा मिळाव्यात याकरिता अनेक लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले पण कोणाकडून मदत मिळाली नाही असं येथील रहिवाशांनी सांगितलं. येथील एक रहिवासी सूर्यवंशी यांच्या माध्यमातून या कुटुंबातील लोकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. आमदार केळकर यांनी या विषयाचं गांभीर्य ओळखून तातडीनं योग्य ती पावलं उचलली. या कुटुंबाची घरं मतदारसंघात येत नसल्यानं आमदार निधी वापरता येत नव्हता. त्यामुळं त्यांनी जिल्हाधिका-यांशी चर्चा केली आणि यावर तोडगा काढला. जिल्हा प्रशासनानं महावितरणाकडे आवश्यक तो निधी वर्ग केला आणि केबल, लाईट मीटरचा प्रश्न मार्गी लागला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या वस्तीत प्रत्येक घरात वीजेचा दिवा पेटला आणि वस्तीतील लोकांनी आमदार संजय केळकर यांच्यासह दिवाळी साजरी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading