स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन

स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आमदार निरंजन डावखरे आग्रही असून स्वंतत्र विद्यापीठाबाबत लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात एक बैठक आयोजित केली जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्य मंत्री रविंद्र वायकर यांनी जाहीर केलं. स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी एका लक्षवेधीद्वारे सभागृहाचं लक्ष वेधलं. मुंबई विद्यापीठाच्या कारभारातील गोंधळामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. विधी अभ्यासक्रमाच्या साडेपाचशे जागा रिकाम्या आहेत. महाविद्यालयांना निकालासह छोट्या छोट्या बाबींसाठी मुंबई विद्यापीठात येऊन पाठपुरावा करणं क्लेशदायक होतं. या पार्श्वभूमीवर कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मिळणार का असा प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला. कोकणातील १०८ महाविद्यालयांपैकी १०३ महाविद्यालयांनी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली असल्याचं डावखरे यांनी सांगितलं. मुंबई विद्यापीठाच्या पदवीला वजन आहे. विद्यापीठाशी ८०१ महाविद्यालयं संलग्न असून त्यातून ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन पध्दतीमुळं विद्यार्थ्यांना आता सर्व सुविधा सुरळीतपणे मिळत आहेत. त्यामुळं उपकेंद्राचे सक्षमीकरण करून सर्व विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या जातील असं उत्तर राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी यावेळी दिलं. या उत्तराला अनेकांनी विरोध दर्शवला. सर्व सुविधा ऑनलाईन झाल्या असल्या तरी विद्यापीठात यावंच लागतं त्यामुळं कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ आवश्यक असल्याचा आग्रह सर्वच सदस्यांनी धरला. त्यामुळं स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली जातील असं रविंद्र वायकर यांनी जाहीर केलं.

Leave a Comment

%d bloggers like this: