येत्या सोमवारी खग्रास चंद्रग्रहण होणार असून त्याचवेळी ब्लडमून योग असून खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचं दर्शन भारतातून होणार नाही. मात्र त्याच रात्री सुपरमूनचं दर्शन भारतातून होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी २१ जानेवारी रोजी ९ वाजून ४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. परंतु यावेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात नसल्यानं हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब आकारानं १४ टक्के मोठे तर ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. या चंद्राला सुपरमून म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ५७ हजार ३४२ किलोमीटर अंतरावर येणार आहे. तर नवीन वर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या वुल्फ मून असे म्हणतात. भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार नसले तरी सुपरमून दर्शन होणार आहे. भारतातून दिसणारे खंडग्रास चंद्रग्रण १६ जुलै रोजी होणार असून सुपरमून दिसण्याचा योग पुन्हा याच वर्षी माघ पौर्णिमेच्या रात्री म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी येणार असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.