साकेत येथे आमदार संजय केळकरांच्या पुढाकाराने साकारतंय नव उद्यान

ठाण्यातील साकेत येथील उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान आता नवीन रूप घेत असून अलिकडेच आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या उद्यानाची पाहणी केली. साकेत येथील हे उद्यान म्हणजे घाणीचे साम्राज्य होते. शासनाच्या ५ हेक्टर जागेत अतिक्रमण वाढलं होतं. येणारे-जाणारे कचरा फेकत होते. राडारोडा फेकला जात होता. शासनाच्या या जागेचा चांगला उपयोग व्हावा या हेतूनं आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेऊन एक अभिनव उद्यान उभारण्यासाठी प्रयत्न केले. वनमंत्र्यांना त्यांनी याबाबत प्रस्ताव दिला आणि त्यातूनच आजचे अभिनव उद्यान उभं राहिलं आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, महेंद्र कल्याणकर यांनीही या उद्यानासाठी मदत केली. आमदार संजय केळकर यांनी आपला आमदार निधी यासाठी दिला. हे उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं यासाठी वनमंत्र्यांसमोर आमदार संजय केळकर यांनी सादरीकरण केलं. त्यावेळी त्यांनी तात्काळ ५ कोटी रूपयांचा निधी दिला. आता या उद्यानात राशी- नक्षत्रांप्रमाणे झाडांची लागवड करण्यात आली आहे. निरनिराळी फळं, फुलझाडंही आहेत. मुलांसाठी खेळणी, जॉगिंग पार्क असून लवकरच पर्यटनाच्या दृष्टीनेही उद्यानात महत्वाची कामं होणार आहेत. गडकिल्ल्यांचं महत्व कळावं यासाठी या उद्यानात ५ किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. याबरोबरच जंगली प्राणी, पक्षी यांचे पुतळे उभारले जाणार आहेत. पुढील १-२ वर्षात हे उद्यान पूर्णत्वास येईल आणि ते ठाण्याचा मानबिंदू ठरेल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: