सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नूतन इमारत निधीकरिता एक धाव शाळेसाठी हा उपक्रम

ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्टने येत्या रविवारी नूतन इमारत निधीकरिता एक धाव शाळेसाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ४०० च्या वर नोंदणी झाली असून पुढील २ दिवसात ही नोंदणी ५०० च्या वर जाईल असा विश्वास संस्थेनं व्यक्त केला आहे. संस्था मराठी विभागाच्या शाळेसाठी १५ कोटींची ६ मजली इमारत उभारत आहे. ही संपूर्ण इमारत फक्त शैक्षणिक उपक्रमासाठीच वापरली जाणार आहे. या विद्या संकुलात मराठी पूर्व प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. नवीन इमारत बांधणीसाठी लागणा-या निधीकरिता संस्थेनं निधी उभारण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतील पहिले दोन उपक्रम हे या महिन्यातील १६ आणि २३ डिसेंबरच्या रविवारी आयोजित करण्यात आले आहेत. हे दोन्ही उपक्रम माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारानं संपन्न होणार आहेत. रविवार १६ डिसेंबरला एक धाव शाळेसाठी हा धावणे अथवा चालणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. २३ डिसेंबरला संध्याकाळी ५ ते साडेसात या वेळेत एक सूर एक ताल शाळेसाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेचे माजी विद्यार्थी सादर करणार आहेत. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या कलाकृतीवर आधारीत सेतू बांधा रे या कार्यक्रमात संगीत नृत्य आणि अभिवचन यांची सुरेल मैफील रंगणार आहे. अधिक माहितीसाठी २५४२ १६३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: