शेतक-यांना विम्याचे हफ्ते न भरण्याचं जिल्हा परिषद उपाध्यक्षांचं आवाहन

ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सलग दोन वर्ष दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही पंतप्रधान पीक विमा योजनेनं शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. गेली २ वर्ष विम्याचे हफ्ते भरूनही पिकाचं नुकसान झालेल्या शेतक-यांना विम्याचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शेतक-यांना विम्याचे हफ्ते भरू नयेत असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान पीक योजनेच्या निकषानुसार कर्जदार शेतक-यांसाठी पीक विमा योजना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छीक आहे. पंतप्रधान पीक विमा योजना हवामानावर आधारीत असल्यामुळे ठाणे- पालघर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असतानाही शेतक-यांना विमा मिळालेला नाही. विमा कंपन्यांना कळवूनही विमा कंपन्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं शेतक-यांनी विम्याचे हफ्ते भरू नयेत असं आवाहन सुभाष पवार यांनी केलं आहे. या परिस्थितीची दखल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनानं घेतली आहे. जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यात शेतक-यांना लहरी पावसाचा फटका बसला असतानाही राज्य शासनानं त्याची दखल घेतलेली नाही. राज्य शासनाकडून जिल्ह्यातील दुष्काळाकडे डोळेझाक केले जात असल्याचा आरोप सुभाष पवार यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading