युती झाली तरी आणि नाही झाली तरी आम्हांला काही फरक पडत नाही. आगामी निवडणुकीत शिवसेनेनं युती तोडू नये म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला १०० कोटींचं गाजर दाखवत आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला. संघर्ष यात्रेचा समारोप झाला असला तरी संघर्ष सुरूच राहण्याचा निर्धारही अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. केंद्र आणि राज्यातले भारतीय जनता पक्षाचे सरकार हे जुमलेबाज, खोटारडे, फसवणूक करणारे आणि लोकशाही विरोधी असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला. शेतक-यांची कर्जमाफी, आत्महत्या, रोजगार, कायदा आणि सुव्यवस्था, जीएसटी यामुळे भारतीय जनता पक्षाविरोधात नाराजी आहे. राज्यातली सर्व स्मारकं अधांतरी लटकलेली आहेत. शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अधांतरीच आहे. शिवस्मारकाचं तर अनेकवेळा केवळ पूजन होत आहे असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं. महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सामावून घेण्यासाठी तीन बैठका झाल्या. पण काँग्रेस एमआयएमला आघाडीत घेण्यास अनुकुल नाही. प्रकाश आंबेडकरांना जेवढ्या जागा देणं शक्य आहे तेवढ्या जागा देण्याचा निर्णय चर्चेतून घेऊ असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं. निवडणुकीतील सर्वे हे खरे असतातच असे नाही पण मार्गदर्शक ठरतात. जिथे कमकुवत आहे तिथे तयारी करता येईल असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
