ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ११व्या वृक्षवल्ली २०१९ या भव्य प्रदर्शनाला १ लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली. महापालिकेतर्फे तीन दिवस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाच्या निमित्तानं झाडं, फुलं, फळं आणि भाजीपाला यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० स्टॉल धारकांसह १०० वैयक्तीक स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेत मध्य रेल्वेला प्रथम क्रमांक, हिरानंदानीला द्वितीय क्रमांक तर गोदरेज कंपनीला तृतीय क्रमांक देण्यात आला. चतुर्थ क्रमांक लोढा ग्रुपला मिळाला. या स्पर्धेत वैयक्तीक पारितोषिक मिळालेल्या स्पर्धकांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या प्रदर्शनात शोभिवंत पाना-फुलांच्या कुंड्या, वामन वृक्ष, कॅक्टस, सकुलंट, ब्रोमिलियाझ, ऑर्कीडस्, गुलाब पुष्प, औषधी आणि सुगंधी वनस्पती, फळझाडं, फळांची मांडणी, भाजीपाला, उद्यान प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरण आधारीत छायाचित्रं, रंगचित्रं आदीच्या प्रदर्शनांचा नागरिकांनी आनंद घेतला.
