वुई नीड यू सोसायटीतर्फे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती पुरस्कार

वुई नीड यु सोसायटीतर्फे दिले जाणारे पुरस्कार यंदा प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. वुई नीड यू सोसायटीतर्फे दरवर्षी समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती असे पुरस्कार दिले जातात. येत्या शनिवारी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चारूशीला देऊलकर यांना समाजव्रती पुरस्कार दिला जाणार आहे. महिला विशेषत: तरूणींमधील वाढत्या आत्महत्या या आणि अशाच गंभीर प्रश्नावर योग्यवेळी समुपदेशनाद्वारे सहकार्य आणि मार्गदर्शन करणा-या आणि गेली २५ वर्ष बॅरिस्टर नाथ पै सेवांगण ही संस्था सक्षम करण्याकरिता कार्यरत असणा-या देऊलकर यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. कला शिकू इच्छिणा-यांसाठी ठाणे आर्ट सोसायटीची स्थापना करून कलाकार निर्माण करण्याचे धाडसी पाऊल उचलणा-या आणि गेली ३२ वर्षे आपल्या सहका-यांसह शेकडो कलाकार निर्माण करण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील निलिमा कडे यांच्या योगदानाबद्दल त्यांना शिक्षणव्रती पुरस्कार दिला जाणार आहे. पाणी म्हणजे जीवन हे शब्दश: खरे करून दाखवण्याचा महत्वकांक्षी प्रयोग ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ८ तालुक्यात यशस्वी करणा-या आणि सरकारी नोकरी करत रोटरी क्लबच्या सहकार्यानं ग्रामीण समाजातील वंचित जनतेला पाण्याच्या विवंचनेतून ४२२ छोटे बंधारे बांधून मुक्तता देणा-या हेमंत जगताप यांना कार्यव्रती पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. यावेळी ७५ वर्ष पूर्ण करणा-या ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचाही गौरव केला जाणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: