पुढील वर्षी सन २०१९ मध्ये दिवाळीचा सण चारच दिवसांचा तर नऊ महिने विवाह मुहूर्त – दा. कृ. सोमण

यावर्षी दिवाळी सलग सहा दिवस संपन्न झाली. परंतु पुढील वर्षी सन २०१९ मध्ये दिवाळीचा सण चारच दिवसांचा असणार आहे. गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी एकाच दिवशी शुक्रवार २५ आक्टोबर रोजी आहे. शनिवार २६ आक्टोबर हा दिवस ‘ खाडा ‘ म्हणजे या दिवशी कोणताही सण नाही.  नरक चतुर्दशी आणी लक्ष्मीपूजन एकाच दिवशी रविवार २७ आक्टोबर रोजी आहे.  सोमवार २८ आक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आहे. त्यामुळे दिवाळीची सुट्टी एकच दिवस मिळणार आहे. मंगळवार २९ आक्टोबर रोजी भाऊबीज असल्याचे पंचांगकर्ते,खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. नवीन वर्षाविषयी अधिक माहिती देतांना दा. कृ. सोमण म्हणाले, लीपवर्ष नसल्याने २०१९ हे वर्ष ३६५ दिवसांचेच असणार आहे. नूतन वर्षी सर्व सण- उत्सव यावर्षींपेक्षा अकरा दिवस अगोदर येणार आहेत. गणेशभक्तांसाठी पुढच्यावर्षी १७ सप्टेंबर रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. सुवर्ण खरेदी करणारांसाठी २०१९ मध्ये ६ जून, ४ जुलै, १ आगस्ट असे तीन गुरुपुष्ययोग  आहेत. सन २०१९ मध्ये विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत. आगस्ट, सप्टेंबर आणि आक्टोबर महिने वगळता इतर नऊ महिने विवाह मुहूर्त आहेत. पुढच्यावर्षी तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे होणार असून १६ जुलैचे खंडग्रास चंद्रग्रहण आणि २६ डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. सोमवार , ११ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण आपल्या इथून दिसणार नाही. १५ जानेवारी २०१०  रोजी म्हणजे आठ वर्षांपूर्वी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते.. पुढच्यावर्षी   सन २०१९ मध्ये  गुरुवार, २६ डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून कंकणाकृती स्थितीत तर उर्वरित भारतातून खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहण निरीक्षण करण्याची संधी खगोलप्रेमीना पुढच्यावर्षी मिळणार आहे. खगोलअभ्यासकांच्या दृष्टीने ही एक पर्वणी असणार आहे. कोइम्बतूर, कन्नुर,करूर, मंगलोर, उटकमंड येथून सूर्यग्रहणातील  कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. मुंबईतून ८५ टक्के सूर्यबिंब ग्रासित दिसणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading