वाहतूक पोलीसांसह टोईंग कर्मचा-यांना धक्काबुक्की करणा-या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर वाहतूक विभागात गोकुळ झाडखंडे हे कासारवडवली उपशाखेत हवालदार आहेत. रविवारी दुपारी कर्तव्यावर असताना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडबंदर रस्त्यावरील डोंगरीपाडा परिसरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा ठरणा-या वाहनांवर कारवाई करत होते. त्यांच्याबरोबर टोईंग कर्मचा-यांचे पथक होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास डोंगरीपाडा येथे पार्कींग केलेल्या दुचाकी उचलत असताना अमित गुप्ता यानं वाहन उचलणा-या मुलांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तेव्हा हवालदार झाडखंडे हे जाब विचारत असताना त्यांनाही शिवीगाळ आणि दमदाटी केली. पोलीस पथकाच्या वरिष्ठांचाही उध्दार केला. त्यामुळं सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
