ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लघु चित्रपट स्पर्धेत कल्पेश राणे दिग्दर्शित ’बी रिस्पॉन्सिबल’ या लघु चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ५० हजार रूपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. किरण वाघ यांच्या ‘रायझिंग’: ए जर्नी ऑफ फिल्ममेकर’ या लघु चित्रपटास द्वितीय तर भूषण साळुंखे दिग्दर्शित इंडिकेशन या लघु चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकास २५ हजार रूपये तर तृतीय क्रमांकास १५ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. त्याचबरोबर ‘इफ वुई कॅन व्हाय नॉट यू’ ’प्रोमोशन’ आणि ’कचरा’ या लघु चित्रपटांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ११ हजार रूपये रोख आणि सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. बदलते ठाणे शहर,स्वच्छता अभियान आणि तुमच्या मनातील ठाणे स्मार्ट सिटी या विषयावर लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या या लघुचित्रपट स्पर्धेत ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई परिसरातील एकूण ६३ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बदलते ठाणे शहर, स्वच्छता अभियान आणि तुमच्या मनातील ठाणे स्मार्ट सिटी याविषयावर एकापेक्षा एक असे लघु चित्रपट या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीतील १३ लघुचित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.
