राष्ट्रवादीचं सरकार आल्यास बुलेट ट्रेन रद्द करून बुलेट ट्रेनचा निधी उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी वापरण्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांचं आश्वासन

बुलेट ट्रेनवर कोट्यावधी रूपये खर्च करण्यापेक्षा उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणं गरजेचं असून आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरू असं आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. रेल्वेच्या पूलासह रेल्वेंना जोडणारे पादचारी आणि रस्त्यावरील पूलही धोकादायक झालेले असताना सरकार त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी चालणा-या प्रवाशांना दोष देत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यासाठी बुलेट ट्रेन रद्द करून त्याचा निधी उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी वापरला जाईल आणि तसे जाहीरनाम्यामध्येही नमूद केलं जाईल असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मुंबई-ठाण्यातील रेल्वेचे पूल तसंच रेल्वेशी संलग्न असलेले पूल आणि रस्त्यावरील पूल आता बरेच जुने झाले आहेत. कोपरीचा पूल तर जर्जर झाला असून या पूलावरील जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना रेल्वेनं तीन वर्षापूर्वीच दिल्या आहेत. मात्र यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. रेल्वेशी संलग्न आणि रस्त्यावरील सर्व पूलांचं ऑडीट करून त्याची श्वेतपत्रिका काढावी आणि रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करावं अशी मागणीही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Leave a Comment