रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये – पालकमंत्री

रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये अशी विनंती करतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय तसंच वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना अधिका-यांना केली. भिवंडी-कल्याण-शीळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहा पदरी रूंदीकरणाच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. रस्ते विकास महामंडळानं यापूर्वी मोठी आव्हानं स्वीकारली आहेत. आपण सूत्रं हाती घेतल्यापासून महामंडळाच्या कामाला अधिक गती दिली असून समृध्दी महामार्ग असो, बोरिवली बोगद्याचे काम असो, कोस्टल रोडमधील बांद्रा, वर्सोवा टप्पा असो या प्रकल्पामध्ये चांगली प्रगती होत आहे. पत्रीपूल तसंच पलावा जंक्शन येथील उड्डाणपूलाची कामं ८ महिन्यात पूर्ण करावीत असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. शीळफाटा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, या रस्त्यावरून नाशिकमार्गे आग्र्याकडे तसंच गोवा-कर्नाटककडे होणारी अवजड वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणारे वाहतुकीचे प्रश्न या रूंदीकरणामुळे सुटणार आहेत. नाशिक, गुजरात, पुणे शहरांकडे जाण्यासाठी शीळाफाटा, भिवंडी वळण रस्ता हा मधला मार्ग असल्यानं अवजड साहित्याचे वाहतूकदार शीळफाटा रस्त्याला प्राधान्य देत आहेत. या मार्गाच्या रूंदीकरणासाठी २१२ कोटी रूपयांचा खर्च असून हे काम येत्या ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे.

Leave a Comment