मुलाच्या आग्रहातून मातेने जिंकली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके

विविध क्रीडा प्रकारात पारंगत असूनही लग्नानंतर मुलाकडे लक्ष द्यावे, यासाठी क्रीडा प्रकारापासून फारकत घेतलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलाच्या आग्रहास्तव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन तीन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात तीन पदके मिळवून ठाण्यासोबतच देशाचेही नाव जगाच्या पटलावर उंचावले आहे. श्रुती महाडिक असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात त्या सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्रुती महाडिक या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रीय स्तरावरच्या ज्युडो पटू आहेत. २००२ मध्ये त्यांनी कांस्य  पदक मिळवले होते. मात्र २००५ पासून त्यांनी खेळाला रामराम ठोकला होता. पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पोलीस दलातील नोकरी सांभाळत आपल्या मुलाच्या संगोपनाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे त्यांचे खेळाशी नाते तुटले होते. याच दरम्यान त्यांचा ८ वर्षांचा मुलगा अमोघ याला  त्यांनी  मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेबाबत माहिती दिली.  वयाची तिशी ओलांडलेले खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. त्यावेळी त्याने आपल्या आईला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरला. त्याच्या आग्रहास्तव श्रुती यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार १३ आणि १४ ऑक्टोबरला मलेशियामध्ये कौलांलमपूर येथे झालेल्या ३२ व्या मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होऊन देशाला उंच उडीमध्ये सुवर्ण, १०० मीटर धावणे स्पर्धेत रौप्य तर तिहेरी उडी प्रकारात कांस्य पदक मिळवले.  पायाला दुखापत झाल्याने त्यांनी जलद  चालण्याच्या स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यामुळे त्यांचे एक पदक हुकले. मात्र  हे पदकही ठाण्याच्याच महिलेने जिंकले. ठाणे नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुनीता दिगुले- औसेकर यांनी या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: