मुंब्रा येथील पारसिक हिलवर असणारा कचरा काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्र

मुंब्रा येथील पारसिक हिलवर असणारा कचरा काढण्यासाठी महापालिकेनं अत्याधुनिक असं यंत्र आणलं आहे. मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील मोठा बोगदा असणा-या पारसिक हिलवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. हा कचरा काढण्याचं काम या यंत्राद्वारे केलं जात आहे. पालिका आयुक्तांनी आज या यंत्राची पाहणी केली. या यंत्रामुळे डोंगर उतारावर ३६० अंशाच्या कोनात काम करता येतं. या डोंगरावरील झोपडपट्टी धारकांनी केलेला कचरा या ठिकाणी साचला असून या कच-यामुळे अनेकदा मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रास झाला आहे. या कच-यातून पडणारं पाणी अनेकदा प्रवाशांच्या अंगावरही पडत असल्याचं अनुभवाला आलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेचे अधिकारी आणि महापालिकेमध्ये झालेल्या बैठकीत हा कचरा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मध्य रेल्वेनं महापालिकेला हा कचरा काढून परिसर स्वच्छ करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेनं हे यंत्र कचरा काढण्यासाठी पारसिक हिल येथे आणलं आहे. या यंत्राची किंमत ६ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं. हे यंत्र अगदी उतारावरीलही कचरा काढू शकतं. गेल्या २ दिवसापासून या यंत्रानं काम सुरू केलं असून हे यंत्र रोज ५० मीटरचा कचरा साफ करतं. आत्तापर्यंत या यंत्रामुळे ४५ टन कचरा जमा करण्यात आला आहे. या परिसरातील हा सर्व कचरा स्वच्छ केला जाणार असून नंतर या परिसराचं रूपांतर पिकनिक स्पॉटमध्ये केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं. या कचरा साफ करण्याच्या मोहिमेवर मध्य रेल्वेचे अधिकारीही देखरेख ठेवून आहेत. रेल्वे मार्गाजवळ हे कचरा काढण्याचं काम सुरू असल्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेनंही या कामावर देखरेख ठेवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading