बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लाखो रूपयांचा गंडा घालणा-या टोळीस गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. ऑक्टोबर २०१७ ते मे २०१८ या काळात दत्तप्रसाद धुरी यांनी बीएमसीचा एच आर अधिकारी असल्याचं भासवलं. त्याचप्रमाणे राहुल केळकर, प्रकाश गायकवाड, प्रिया गायकवाड हे बीएमसीचे इतर मोठे अधिकारी असल्याचं भासवून जवळपास १६ बेरोजगारांना बीएमसीमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून जवळपास १८ लाख रूपये स्वीकारले अशी तक्रार पोलीसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला दत्तप्रसाद धुरी हा सिंधुदुर्गला पळून गेल्याची माहिती मिळाली तसंच राहुल केळकर, प्रकाश गायकवाड यांना डोंबिवलीतून अटक करण्यात आली. तर दत्तप्रसाद धुरी आणि अनिकेत राणे यांना सिंधुदुर्ग मधून अटक करण्यात आली. याप्रकरणी तपासात एकूण ३६ साथीदारांनी ५४ लाखांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे अशी माहिती पोलीसांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
