मानपाडा येथील बंद असलेली महिला शौचालय लवकरच सुरू केली जाणार आहेत. ही शौचालयं बंद असल्यामुळे बरीच टीका झाली होती. महापालिकेनं महिलांसाठी शहराच्या विविध भागांमध्ये प्रसाधनगृहं सुरू केली आहेत. या महिला प्रसाधनगृहांची साफसफाई महिला कर्मचारी करत असतात. सध्या महिला प्रसाधनगृहाच्या ठेकेदाराचा ठेका संपल्यामुळं ही शौचालयं महिलांच्याच सुरक्षिततेच्या दृष्टीनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. मानपाडा हा विभाग वर्दळीचा परिसर आहे. या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी येणा-या गाड्यांची वाहतूक दिवसभर सुरू असते. या ठिकाणी कोणीही महिला कर्मचारी उपलब्ध नसताना शौचालय सुरू ठेवल्यास एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रसाधनगृहात विश्रांती कक्ष, स्तनपान कक्ष, सॅनिटरी व्हेन्डींग मशिन, एटीएम अशा प्रकारच्या सर्व सुविधा असल्यामुळं महिलांची सुरक्षितता लक्षात ठेवून शौचालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साफसफाईबाबत नवीन ठेका देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. याबाबत ठेका देण्यात आल्यानंतर शौचालय पुन्हा सुरू केली जातील असं महापौर मिनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
