मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीप्रकरणी ५ आरोपींना अटक

अंबरनाथ जवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दखल वन विभागानं घेतली असून याप्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तुकाराम आडे, रामू राठोड, अनिल आडे, शुभम आडे, प्रकाश राठोड या व्यक्तींनी शेण्याच्या गोव-या थापण्यासाठी जागा साफ केलेली आढळून आली. तिथूनच आग पसरल्याचं आढळलं आहे. वरप येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १८.७ हेक्टर क्षेत्रावर ९ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ३ हेक्टर क्षेत्र जळालं असून १ हजार रोपांना आगीची झळ पोहचली आहे. मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे. याच ठिकाणी गेल्यावर्षी लागलेल्या आगीत ८ हेक्टर क्षेत्रातील २० हजार रोपांना झळ बसली होती. त्यानंतर वन विभागानं या ठिकाणच्या रोपांना अति तातडीनं पाणी देण्यासाठी बोअरवेल घेणे, मोटार बसवणे, वीज पुरवठा करणे यासाठी पावणे सात लाख रूपये खर्च केले आहेत. रोपवनाच्या रखवालीसाठी दोन रखवालदारही ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर दाट वाढलेले गवत काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र दिवाळीमुळं स्थानिक मजूर मिळत नसल्यानं बाहेरून मजूर आणून कामं सुरू होती. ज्या क्षेत्रात आग लागली नाही तिथे ९१ टक्के रोपं जिवंत असल्याचं उप वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading