महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्यासोबत महापालिका आयुक्तांच्या झालेल्या बैठकीमुळं अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. घोडबंदर रस्त्याला समांतर १५ किलोमीटर लांब आणि ४० ते ४५ मीटर रूंदीचा रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित आहे. या रस्त्याला प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. या रस्त्याबाबत नव्यानं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आर. ए. राजीव यांनी महापालिकेला दिल्या. कळवा येथील छत्रपती शिवाजी चौक ते रेतीबंदर या ४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आर. ए. राजीव यांनी दिली. दिवा भागातील म्हातर्डी, दातिवली, आगासन, बेतवडे या विभागामधील रस्त्यांचं काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याण फाट्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कल्याण फाटा जंक्शन येथे ग्रेड सेप्रेटर प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधला जाणार असल्याचंही राजीव यांनी सांगितलं. कल्याण फाटा येथे ग्रेड सेप्रेटर तर शीळफाटा येथे उड्डाणपूल बांधण्यासही आर. ए. राजीव यांनी तत्वत: तयारी दर्शवली आहे. प्राधिकरणाकडून भाडेतत्वावरील घरामध्ये ५० टक्के सदनिका महापालिकेस देण्याबाबतची पालिका आयुक्तांची विनंतीही आर. ए. राजीव यांनी मान्य केली आहे.
