बोगस फार्मासिस्ट प्रमाणपत्र घोटाळ्यात आणखी ६ आरोपींना अटक

बोगस फार्मासिस्ट प्रमाणपत्र घोटाळ्यात आणखी ६ आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेनं महिनाभरापूर्वी फार्मासिस्टची बनावट प्रमाणपत्रं देणा-या एका सहा जणांच्या टोळीला जेरबंद केलं होतं. दीपांकर घोष यांच्या तक्रारीनंतर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बनावट फार्मासिस्ट आणि उत्तरप्रदेश, अजमेर आणि दिल्लीतील शैक्षणिक संस्थांच्या नावाची दहावी-बारावीची बनावट प्रमाणपत्रं बाळगून औषधं चालवणा-यांची पोलखोल केली होती. ही बनावट प्रमाणपत्रं डॉ. पुरूषोत्तम तहिलरामानी यांच्या दीप पॅरामेडीकल या ऑर्गनायझेशन मधून घेऊन विविध राज्यात औषध दुकानं चालवण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. त्यावेळी तहिलरामानी यांच्यासह ६ जणांना जेरबंद करण्यात आलं होतं. काल या तपासात नरेंद्र गेहलोत, हरिशंकर जोशी, दीपक विश्वकर्मा, प्रेमचंद चौधरी, प्रविण गड्डा, महेंद्र भानुशाली अशा ६ औषधाच्या दुकानांच्या मालकांना अटक करण्यात आली. या सहाही जणांनी बनावट प्रमाणपत्रावर तहिलरामानी यांच्या संस्थेतून डी-फार्मची बनावट प्रमाणपत्रं मिळवून मुलुंड, मुंब्रा, भिवंडी, डोंबिवली अशा विविध ठिकाणी औषधांची दुकानं थाटली होती. पोलीसांनी या ६ जणांना अटक केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या १२ झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading