टाकाऊ आणि दुर्लक्षित झालेल्या जागेवर सुंदर फुलपाखरू उद्यान निर्माण करण्यात आलं असून उद्या या फुलपाखरू उद्यानाचं लोकार्पण होणार आहे. फुलपाखरू उद्यानाच्या जवळजवळ १७०० चौरस मीटर जागेत पूर्वी मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा आणि टाकाऊ वस्तूंचा डोंगर झाला होता. त्यामुळं या विभागात दुर्गंधी, डास यांचा प्रादुर्भाव वाढला होता. पावसाळ्यात पाणी साचून डासांची निर्मिती होत होती. या ठिकाणी वारंवार साफसफाई करूनही तोच प्रकार घडत होता. म्हणून या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांचा वापर करून उद्यान करण्याची कल्पना पुढे आली. उद्यानं तर ठाण्यात सर्वत्र असल्यामुळे इंटरनेटवरून माहिती काढून फुलपाखरू उद्यान निर्माण करण्याची कल्पना सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडली. आता या ठिकाणी सुंदर, सुशोभित आणि फुलपाखरांना आकर्षित करेल अशा विविध प्रकारची झाडं लावून फुलपाखरू उद्यान बनवण्यात आलं आहे. या उद्यानात पेंटास, करवंदा, हळदीकुंकूम्, इक्सोरा अशा प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत. या झाडांमुळे फुलपाखरू आकर्षित होत असून सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात फुलपाखरांचे थवेच्या थवे पहायला मिळतात. प्रभाग क्रमांक १९ मधील या आगळ्या वेगळ्या फुलपाखरू मैदानामध्ये नागरिकांना फिरण्यासाठी पदपथ, पायवाटा, हिरवळ, हँगिंग ब्रीज, विविध रंगांची कमळाच्या आकाराची पाण्याची डबकी तसंच नागरिकांना बसण्यासाठी गझबो अशा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
