पु.लंनी मध्यमवर्गाची कधी खिल्ली उडवली नाही किंवा तेजोभंगही केला नाही – अंबरिश मिश्र

दुस-या महायुध्दानंतर घडलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नयनाने मध्यमवर्ग उदयाला आला. या मध्यम वर्गाचे पु. ल. देशपांडेंनी मातेप्रमाणे सिंचन, संगोपन करून त्यांच्यावर वैचारीक संस्कार केले. या संस्कारासाठी त्यांनी विनोदाचा आधार घेतला. पण असे करताना पु.लंनी मध्यमवर्गाची कधी खिल्ली उडवली नाही किंवा तेजोभंगही केला नाही असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी ठाण्यात बोलताना केलं. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत पु.ल. एक मर्यादा पुरूषोत्तम या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना अंबरिश मिश्र बोलत होते. लोकशाहीमध्ये दुस-याचे ऐकून घेण्यासाठी मनाची तयारी पाहिजे. आपला विचार मोजक्या पण सौम्य शब्दात सांगता यायला हवा. चर्चेवर, भाषणावर मतभेद असू शकतात पण ते जपून सौम्यपणे वापरायचे असतात. त्यासाठी पु.लंनी विनोदाचा आधार घेतला. असे विश्लेषण अंबरिश मिश्र यांनी केलं. पु.लंनी आपल्याला खूप हसवलं. तेही आपल्याबरोबर हसत होते. पु.ल कधीही वय, जात, धर्म, स्टेटस बघत नसत यामुळं शक्य असूनही पु.लंनी नवीन महागडी गाडी न घेता जुनी गाडी घेतली आणि बाबा आमटे, जयंत नारळीकर आदी समाजोपयोगी कार्य करणा-या व्यक्ती, संस्थांना पैसा वाटला असे अंबरिश मिश्र यांनी सांगितलं. बंगाली भाषेच्या तुलनेत मराठीकडे पाहिले तर काय दिसते. आपले मराठी पुढारी मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालण्यात धन्य मानतात. मग मराठीचे काय करायचे, भाषा कोणतीही असो ती भावविश्वाची, भाव जीवनाची लय आहे. भाषेची ओढ असायला हवी असं सांगून त्यांनी प्रसिध्द लोकगायक भूपेंद्र हजारिका यांचे उदाहरण दिले. हजारिका न्यूयॉर्कमध्ये प्राणी संग्रहालयात गेल्या असताना रॉयल बेंगाली टायगर दिसला. त्याच्याकडे पाहता हजारीका आणि त्यांचे मित्र बंगाली बोलत होते. तेव्हा तो वाघही त्यांच्याकडे एकटक बघत जागेवरच थांबला. तिथल्या स्वयंसेवकांच्या हे लक्षात आलं त्यांनी या दोघांना जोरजोरात बोलण्यास सांगितले. हा वाघ बंगालमधून आणला असून तो ८ दिवस जेवला नसल्याचं सांगितलं. तेव्हा हजारीका आणि त्यांचा मित्र जोरजोरात बंगालीत बोलू लागले तेव्हा त्या वाघानं मनसोक्त भोजन केले. प्राण्याला जर भाषेची ओढ आहे तर आपल्याला मराठी भाषेची लाज का वाटते, असा प्रश्नही अंबरिश मिश्र यांनी उपस्थितांना केला.

Leave a Comment

%d bloggers like this: