राफेल विमान खरेदीतील घोटाळा उघडकीस आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. राफेल घोटाळ्यासंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. राफेल खरेदी प्रकरणात मोदी सरकारने देशाचे ४१ हजार २०५ कोटींचे नुकसान केले. रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीला कंत्राट देऊन अंबानींचा फायदा केला. राफेल लढाऊ विमान खरेदीत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला. याप्रकरणी मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन न्यायालयाचीही दिशाभूल केली. राफेल घोटाळा उघडकीस आणण्यासाठी मोदींची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. मोदी यांना जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल त्यासाठी राफेल घोटाळा प्रकरणाचा पर्दाफाश करण्याकरिता जनतेत जाऊन पाठपुरावा करणे, प्रबोधन करणे, आंदोलन करणे याद्वारे काँग्रेस पक्ष कार्यरत राहील असं सचिन सावंत यांनी सांगितलं.
