कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा शास्त्रीय संगीताचा समृध्द वारसा जोपासणारा प्रतिष्ठेच्या अशा पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन उद्यापासून करण्यात आलं आहे. महापालिका, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या सहकार्यानं या संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. गडकरी रंगायतन येथे हा संगीत समारोह आयोजित करण्यात आला असून या संगीत महोत्सवाचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या महोत्सवाचं उद्गाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जयपूर येथील प्रख्यात सूरबहार वादक अश्विनी दळवी यांच्या सूरबहार वादनानं तर गायिका ज्योती खरे यांच्या शास्त्रीय गायनानं पहिल्या दिवसाची सुरूवात होणार आहे. सोमवार १७ डिसेंबर रोजी वृषाली दाबके यांचं कथ्थक नृत्य असून ध्रूपद गायक पंडीत उदयकुमार मलिक यांच्या ध्रूपद गायनानं समारोप होईल. मंगळवार १८ डिसेंबर रोजी रूपक पवार, निषाद पवार यांचं तबला वादन तर सूफी गायक डॉ. भारती बंधू सूफी यांचं गायन होणार आहे. बुधवार १९ डिसेंबर रोजी गायिका धनश्री पंडीत राय यांच्या ठुमरी, कजरी अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारांचं सादरीकरण होणार आहे त्यानंतर श्रीनिवास जोशी यांच्या शास्त्रीय गायनानं या सत्राचा समारोप होणार आहे. गुरूवार २० डिसेंबर रोजी अंतर्नाद निर्मित श्यामरंग हा संगीत नाट्यमय विशेष कार्यक्रम होणार आहे, तर रूपक कुलकर्णी यांचं बासरी वादन, पंडीत कैलाश पात्रा यांचं व्हायोलीन वादन आणि उस्ताद फारूक लतीफ खान यांच्या सारंगी वादनानं या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
