नवीन कळवा पूलाचं काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे. कळव्याला जोडणा-या नवीन पूलाचं काम ३६ महिन्यात पूर्ण करण्याची अट करारपत्रामध्ये होती. मात्र ही अट न पाळण्यात आल्यानं ४ वर्ष झाली तरी पूलाचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही. यामुळे ठाणे-कळवेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं आयुक्तांनी पूलाचं काम तात्काळ पूर्ण करून घ्यावं अन्यथा कळवेकरांचा उद्रेक होईल. संबंधित ठेकेदार आणि पालिका अधिका-यांना जनताच काळं फासेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. सप्टेंबर २०१० मध्ये कळवा खाडीवरील पूल बंद करण्यात आला. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पूल मंजूर करण्यात आला. जे. कुमार आणि सुप्रीम यांना या कामाचा ठेका देण्यात आला. २०१४ मध्ये या पूलाचा कार्यादेश देण्यात आला. किनारा नियमन आणि वनखात्याच्या परवानग्या घेणं हे संबंधित ठेकेदारांना सक्तीचं करण्यात आलं होतं. मात्र आता ४ वर्ष उलटूनही पूलाचं काम अपूर्णच आहे. जे कुमार यांना मुंबई महापालिकेनं काळ्या यादीत टाकलं आहे तर सुप्रीम कंपनीकडून दुर्गाडी आणि कल्याण फाटा येथील पूलाचं काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं काढून घेतलं आहे. त्यामुळं ठाणे महापालिका आयुक्तांनीही ठेकेदारांवर कारवाई करावी आणि नवीन ठेकेदार नियुक्त करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना ठाण्याच्या विकासाबाबत कोणत्याही प्रकारची आस्था नसल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. कळव्याचा रखडलेला पूल हे याचं उदाहरण आहे. १७० मीटरचा हा पूल ४ वर्ष झाली तरी पूर्ण होत नाही. आयुक्तांनी त्रयस्थ संस्थेकडून परिक्षण करून या पूलाचं काम नवीन ठेकेदाराकडे वर्ग करावे अन्यथा येथील जनता ठेकेदारांसह पालिका अधिका-यांना काळं फासेल असा इशारा आनंद परांजपे यांनी एका पत्रकार परिषदेत दिला.
