दुर्मिळ अशा खवले मांजराची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक

दुर्मिळ अशा खवले मांजराची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं डायघर इथून अटक केली आहे. सागर पवार आणि अब्दुल महामृत या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आलं आहे. या खवले मांजराची किंमत ४० लाख रूपये आहे. काल एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी ही माहिती दिली. मुंब्रा-पनवेल रस्त्यावरील दहीसर येथे काही व्यक्ती वन्य प्राण्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शरद तायडे यांना मिळाली होती. या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दहीसर येथे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची तपासणी केली असता एका काळ्या रंगाच्या सॅकमध्ये गोणपाटात गुंडाळलेले आणि तोंडात एकही दात नसलेले दुर्मिळ असे खवले मांजर आढळले. चौकशीमध्ये हे खवले मांजर ४० लाख रूपयांमध्ये विक्रीसाठी आणलं असल्याचं उघडकीस आलं. हे खवले मांजर नक्की कोण खरेदी करणार होते आणि ते कुठून आणले याचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: