एका दाम्पत्यानं ठाण्यातील एका डॉक्टरची दुबईमध्ये रूग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक केली आहे. हे डॉक्टर वंध्यत्वावर उपचार करतात. या उपचारासाठी हे दाम्पत्य दोन वर्षापूर्वी डॉक्टरकडे आलं होतं. या उपचारादरम्यान डॉक्टर आणि दाम्पत्यामध्ये झालेल्या संवादातून या दाम्पत्यानं दुबईमध्ये असं रूग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवलं. त्यापोटी डॉक्टरांकडून सव्वा दोन कोटी रूपयेही घेतले. या रूग्णालयासाठी ३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. या रूग्णालयासाठी संबंधित डॉक्टरांबरोबर या दाम्पत्याच्या अनेक बैठकाही झाल्या. दुबई भेटही घडवण्यात आली. दुबई भेटीदरम्यान या दाम्पत्यानं रूग्णालयाच्या कामासाठी दिलेले पैसे कर्मचा-यांना दिलेच नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या डॉक्टरने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीसांनी या दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
