दीपोत्सवाची सुरूवात ही वसुबारसेपासून

वर्षातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा दिवाळीचा सण उद्यापासून सुरू होत आहे. उद्या वसुबारस. दीपोत्सवाची सुरूवात ही वसुबारसेपासून होते. अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुध्द प्रतिपदेपर्यंत दीपोत्सव साजरा केला जात असला तरी गावांमध्ये मात्र वसुबारसेपासूनच दीपोत्सव साजरा होतो. पावसानंतर भरघोस पीकाच्या रूपानं शेतक-याच्या हाती सोनं आलेलं असतं. सर्वत्र सुख समाधान आणि तृप्ततेचं वातावरण असतं. त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अश्विन वद्य द्वादशीपासूनच दिवाळी साजरी केली जाते. वसुबारसेच्या दिवशी गोवत्स धेनूची पूजा करण्याची प्रथा आहे. गाईला आपण माता मानलं आहे. गाईविषयीची कृतज्ञता यातून व्यक्त होते. प्रथम वासराला दूध देऊन गाय-वासराची पूजा केली जाते. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मुलांचं कल्याण आणि उत्तम आरोग्यासाठी तसंच कुटुंबाच्या भरभराटीसाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. स्त्रिया आवर्जून या दिवशी उपवास करतात. संध्याकाळी गाईच्या पूजेनंतर भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. प्राचीन काळी पृथु राजाच्या राज्यात पृथ्वीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा त्यानं गोमातेचं पूजन केलं त्यावेळी संकटात सापडलेली सृष्टी नवजीवनानं पुन्हा बहरली. तोच हा द्वादशीचा दिवस. वसुबारसेला गाईला पुजून भारतीयांनी तिला गोठ्यातून देव्हा-यात आणलं आहे. या सा-याचं स्मरण देणारी ती वसुबारस. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक परिवारातर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा.

 

Leave a Comment

%d bloggers like this: