मुंबई-पुणे धावणा-या प्रगती एक्सप्रेसला नवीन साज

मुंबई-पुणे धावणा-या प्रगती एक्सप्रेसला नवीन साज चढवण्यात आला असून नवीन साज चढवलेली प्रगती एक्सप्रेस ही उद्यापासून रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. प्रगती एक्सप्रेस २७ डिसेंबर १९९१ मध्ये सुरू करण्यात आली. ७ जुलै २०१२ ला प्रगती एक्सप्रेस कर्जत-पनवेल दिवा या मार्गावरून धावू लागली. आता उद्यापासून ही नवीन आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सजलेली गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. प्रगती एक्सप्रेसला उद्यापासून उत्कृष्ट डबे लावले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या गाडीला उत्कृष्ट डबे असणारी भारतातील ही पहिली गाडी आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त करण्यासाठी एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार या डब्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. अत्याधुनिक शौचालय, नवीन रंगसंगती, गाडीमध्ये सिरॅमिक टाईल, स्वच्छतेसाठी नवीन वॉशरूम्स, नवीन खिडक्या, स्वच्छ हवा मिळण्यासाठी नवीन व्हेन्टीलेटर्स, एलईडी लाईटस्, नवीन फॅन त्याचप्रमाणे वातानुकुलित डब्यांमध्ये प्रवाशांसाठी उद्घोषणेची सुविधा प्रत्येक डब्यात वेगवेगळी रंगसंगती अशा अनेक सुविधा यात देण्यात आल्या आहेत. या गाडीच्या डब्यांमध्ये सिग्नल इन्फॉर्मेशन पोस्टर्स, ब्रेल स्टीकर्स, कोच इंडिकेटर बोर्ड, घसरणार नाही अशा टाईल्स, शौचालयामध्ये अत्याधुनिक वायुव्हीजन यंत्रणा, फायबरची वॉश बेसिन्स, स्टेनलेस स्टील लगेज रॅक्स, वातानुकुलित डब्यांमध्ये रोलर ब्लाईंड कर्टन्स, ॲक्रॅलिक मोबाईल होल्डर्स, ॲटोमेटीक वेस्टर्न टॉयलेट सिट कव्हर्स अशी या गाडीची आणखी काही वैशिष्ट्यं आहेत. मध्य रेल्वेनं डब्यांमध्ये आधुनिक सुविधा देण्यासाठी ५ गाड्यांची निवड केली होती. मध्य रेल्वेला प्रत्येक डबा अत्याधुनिक करण्यासाठी ६० लाख रूपये खर्च आला आहे. अशा विविध अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी ही गाडी उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: