दिवा- मुंब्रा परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या करणा-या त्रिकुटापैकी दोघांना मुंब्रा पोलीसांच्या गस्ती पथकानं अटक केली आहे. विशाल शेडगे आणि रामचंद्र मेंगे हे दोघेही दिवा येथे राहत असून त्यांचा आलोक नावाचा तिसरा साथीदार फरार आहे. या दुकलीकडून १० घरफोड्यातील १० एलईडी टीव्ही, १० घरगुती गॅस सिलेंडरसह सोन्याचांदीचा ऐवज असा तब्बल साडे ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पहिल्यांदाच चो-या करणा-या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिवा परिसरात गेल्या काही दिवसापासून दिवसाढवळ्या चाळीमध्ये घरफोड्या होण्याचे प्रकार वाढले होते. या अनुषंगाने पोलीस उपायुक्त स्वामी यांनी दिवा गुन्हे प्रकटीकरण पथक नेमले होते. ८ नोव्हेंबर रोजी हे पथक मुंब्रादेवी कॉलनीमध्ये पायी गस्त घालत असताना संशयितरित्या वावरताना शेडगे जाळ्यात सापडला. पोलीस चौकशीत त्याने दिवा भागात चाळ आणि इमारतीच्या तळ मजल्यावरील घरे बनावट चावीने उघडून १० घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसंच या कामात त्याला आलोक आणि रामचंद्र मेंगे या साथीदारांनी मदत केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी मेंगे याच्या मुसक्या आवळून १६५ ग्रॅम सोन्याचे तर २५ ग्रॅम चांदीचे दागिने, लॅपटॉप, घड्याळे आदी ऐवजासह १० सिलेंडर आणि १० टिव्ही असा एकूण साडेसहा लाखाहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत केला.
