दिवा परिसराचा विकास स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करूनच करण्याची पालिका आयुक्तांची ग्वाही

डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई आणि सांगर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राबवण्याच्या दृष्टीनं तेथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांची भेट घेऊन परिसराच्या विकास कामांबाबत चर्चा केली. स्थानिक ग्रामस्थांची चर्चा करूनच विकासाचा आराखडा तयार करण्यात येईल याची ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना डायघर गावास भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. यावेळी पालिका आयुक्तांनी कच-यापासून वीज निर्मिती या प्रकल्पाचं सादरीकरण करून हा प्रकल्प कसा असेल याची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेच्या वेळी शीळ येथे उपप्रभाग कार्यालय निर्माण करणं, खिडकाळी आणि डायघर येथे प्रत्येकी दोन उद्यानांची निर्मिती, खिडकाळी-डायघर येथे स्टेडीयम बांधणे, मैदान विकसित करणे, शीळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करणे, देसाई येथे आरोग्य केंद्र बांधणे, पडले येथे ज्युनियर कॉलेज आणि शाळांची दुरूस्ती करणं, डायघर येथे आगरी समाज भवन बांधणं, देसाई येथे आरोग्य केंद्र, प्रसूतीगृह आणि ट्रामा केंद्राचं बांधकाम करणं, परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्ते बांधणं, पदपथ, विद्युत कामं, पाणी पुरवठा, मलनिस्सारण यांची कामं करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. या परिसरात स्मशानभूमी बांधणं, रस्ते मजबुतीकरण, रस्त्यावरील दिवाबत्ती, जलवाहिन्या अशा कामांविषयी आग्रही असल्याचं शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांना सांगितलं. आमचा विकास कामाला किंवा कोणत्याच प्रकल्पाला विरोध नसल्याचं सांगून गावक-यांना विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार केली. गावक-यांशी चर्चा करूनच विकास आराखडा निश्चित करणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्तांनी यावेळी दिली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: