तीन वर्षापासून अपहृत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आलं आहे. फरिदा शेख यांच्या मुलीला नोव्हेंबर २०१६ मध्ये अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास लागत नसल्यानं ही तक्रार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती. तपासादरम्यान मुलीची मोठी बहिण आणि तिच्या पतीने १० दिवसापूर्वी टिकटॉक ॲपवर भोजपुरी गाण्याचा एकत्रित व्हीडीओ अपलोड केला होता. हा व्हीडीओ पाहून अपहृत मुलीने तिच्या मेव्हण्याचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि तिने अभय शेट्टी नावाने स्वत:चे फेक फेसबुक अकाऊंट तयार केले आणि मेव्हण्याबरोबर चॅटींग करत होती. चॅटींग दरम्यान ती त्यांच्याकडून इतरांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करत होती. ही माहिती त्यांनी पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीसांनी मुलीची आई आजारी आहे असा मेसेज पाठवण्यासा सांगितला. हा मेसेज वाचून मुलीला न राहवल्याने तिने व्हीडीओ कॉल केला आणि ती अभय शेट्टी नसून अपहृत मुलगी असल्याचं तिने मान्य केलं. तिने बहिणीला भेटायला येते असं सांगून चरईतील नर्सिंग प्रशिक्षण केंद्रात ती आली असता पोलीसांनी तिला ताब्यात घेतले. या मुलीची चौकशी केली असता तिने सांगितले की घरातून गेल्यानंतर १० दिवस गोरेगाव येथे वास्तव्यास होती. त्यानंतर ती कॅटरिंग कामासाठी ३-४ महिने सुरतला होती. नंतर वसईत ८-९ महिने राहिली. सध्या ती नालासोपारा इथे राहत होती. स्वत:हून घरातून निघून गेल्याचं सांगून कोणाविरूध्द काहीएक तक्रार नसल्याचं तिनं सांगितलं.
