डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून ठाणे, मुंबई, पालघर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी, वैद्यकीय दुकानं, बँका आणि किराणा दुकानदार यांची फसवणूक करणा-या व्यक्तीस नौपाडा पोलीसांनी अटक केली आहे. एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी ही माहिती दिली. ठाण्यामध्ये ज्वेलर्स, डॉक्टर्सकडून बोलत असल्याचं सांगून फसवणुकीचे प्रकार घडले होते. यामध्ये सराफ, बँका अशा व्यक्तींना फसवण्यात आले होते. एखादी व्यक्ती अथवा बँकेला नामवंताच्या नावाने फोन करून पैसे मागण्याची मनिष आंबेकरची पध्दत होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ६, तुळींज पोलीस ठाण्यात १, कळवा पोलीस ठाण्यात २, वागळे आणि भांडूप पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद झाली होती. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मनिष आंबेकरला जेरबंद केलं. त्याच्याकडून ११ गुन्हे उघडकीस आले असून १ लाख २० हजार रूपयांची रोकड आणि ५ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी दिली.
