ठाण्यात ६९वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

भारताचा ६९वा प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. जिल्ह्यातील मुख्य शासकीय सोहळा पोलीस क्रिडा संकुलात झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना लागू झाली म्हणून त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दलापासून ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक, राज्य उत्पादन शुल्क, प्रादेशिक परिवहन विभाग सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगेश सावंत, पोलीस निरिक्षक विजय पवार, संजय साबळे, तुकाराम पोवळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर जाधव, प्रबोधन येजरे, योगेश दाभाडे, पोलीस शिपाई अनिल चव्हाण यांना ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलं. अदिती परब, रोझलिन लुईस, अमन फरोग, किमया कदम, अपूर्वा पाटील, दिक्षा सोमसूरकर, साक्षी तोरणे, संकेत कदम, देव थापा आणि श्रेया भंगाळे यांचा खेलो इंडियात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नव उपक्रम आधारीत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगिता भागवत, २०१६च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या ज्योती बलवले यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ठाणे महापालिकेत महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शहरातील विविध चौक, शासकीय कार्यालयं, पोलीस स्थानकं, विविध शाळा आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading