ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला शासनाची मंजुरी

ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी शहरात वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागवण्यासाठी कॉम्प्रिहेन्सीव्ह मोबिलीटी प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये जलद वाहतूक प्रणाली म्हणून अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनं या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केला असून या अहवालास आता शासनानंही मान्यता दिली आहे. हा अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प २९ किलोमीटरचा आहे. यामध्ये २० उन्नत तर २ भुयारी अशी २२ स्थानकं असणार आहेत. १३ हजार ९५ कोटींच्या या प्रकल्पामुळे २०२५ पर्यंत रोज साडेसात लाख प्रवाशांची वाहतूक करणं शक्य होणार आहे. नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस डेपो, शिवाईनगर, निलकंठ टर्मिनल, गांधीनगर, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकूम नाका, बाळकूम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन ही स्थानकं या प्रकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महामेट्रोतर्फे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: