ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या काही मिनिटात ९०० कोटींचे प्रस्ताव मंजूर

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा कोणत्याही चर्चेविना ९०० कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. परिवहन उपक्रमाच्या बस खाजगी ठेकेदारास भाडेपट्ट्याने देण्याच्या प्रस्तावावरून राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि प्रशासनाला कोंडीत पकडले होते. हा प्रकार अंगलट येत असल्याचं लक्षात येताच आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोधकांना बोलूच दिलं नाही. त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळात १०० हून अधिक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे पालिका आयुक्त गोंधळातच प्रस्ताव मंजूर व्हावे यासाठी आग्रह धरताना दिसत होते. शहराच्या विविध भागातील रस्त्यांसाठी ७०० कोटींचे प्रस्तावही या सभेत मांडण्यात आले होते. ठाण्यातील उड्डाणपूलांची कामं मंदगतीने सुरू असताना खर्च वाढवून देण्याचा प्रस्तावही सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. एकूण ९०० कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यानं त्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित होती. मात्र सभागृहातील गोंधळाचा फायदा घेत कोणत्याही चर्चेविना हे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानं सध्या वादाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. परिवहन उपक्रमाच्या बस भाड्यानं देण्याच्या प्रस्तावावरून या गोंधळाला सुरूवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नजीब मुल्ला यांनी केलेल्या आरोपावरून गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादी राजकीय आरोप करत असेल तर नजीब मुल्ला यांना सभागृहाबाहेर काढले जावे अशी मागणी शिवसेनेनं केली. त्यामुळं सभागृहात गोंधळ सुरू झाला. या गोंधळातच ९०० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. चर्चेविना प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे काही नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. शिवसेना विरोधात घोषणाबाजी करत व्यासपीठावर ठिय्या मांडला. हे दोन्ही पक्ष आक्रमक झाल्याचं पाहून शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळातच राष्ट्रगीत सुरू करून सभा समाप्त केली.

Leave a Comment

%d bloggers like this: