ठाणे महापालिकेच्या न झालेल्या वसुलीबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेच्या ३०० कोटीहून अधिक रक्कमेच्या न झालेल्या वसुलीबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती धर्मराज्य पक्षानं राज्याच्या नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. महापालिका आयुक्त पदाची सूत्रं संजीव जयस्वाल यांनी जानेवारी २०१५ मध्ये घेतली. त्यावेळी झालेल्या लेखा परिक्षणानुसार महापालिकेचे एकूण ११२ कोटी रूपये येणे शिल्लक होते. तर १४ हजार ९८ आक्षेपांची पूर्तता होणं बाकी होतं. सन २०१४-१५ मध्ये वसुलीत आणखी घट होऊन ती १८८ कोटी रूपये झाली तर आक्षेपांची पूर्तता फक्त ५ टक्क्याने कमी झाली. २०१६-१७ मध्ये थकीत रक्कम १६० कोटी झाली. २०१६-२०१७ च्या लेखापरिक्षणात कर वसुलीतील थकबाकी ही २९२ कोटींवर गेली. त्याचबरोबर १२ हजार ७२० आक्षेपांची पूर्तता होणं बाकी होतं. २०१७-२०१८ चा लेखा परिक्षण अहवाल अद्याप तयार नाही पण वसुलीची ही रक्कम व्याजासह ४०० कोटी रूपयांपर्यंत पोहचेल आणि आक्षेपांच्या पूर्ततेची आकडेवारी १० हजाराच्या खाली उतरणं अशक्य आहे. कमी वसुली, गणिती चुका, दंड वसुली न करणं, चुकीची कर योग्य वसुली, पुनर्गुंतवणूक उशिरा केल्यानं व्याजाचे नुकसान असे अनेक आक्षेप घेण्यात आलेले असतानाही कारभारात सुधारणा झालेली नाही. यावरून पालिका आयुक्तांचा कारभार दर्जाहीन असल्याचा आरोप धर्मराज्य पक्षानं केला आहे. यासाठी आयुक्तांनी केलेल्या कारभाराची, घेतलेल्या निर्णयाची आणि लेखाधिका-यांनी घेतलेल्या आक्षेपांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रारवजा विनंती धर्मराज्यचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: