कारागृह विभागाच्या दक्षिण क्षेत्रातील अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलं होतं. या विभागीय स्पर्धेत ठाणे मध्यवर्ती कारागृह संघ अव्वल ठरला. कारागृहाच्या दक्षिण विभागातील अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेत ठाणे मध्यवर्ती कारागृह, मुंबई मध्यवर्ती कारागृह, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह आणि रत्नागिरी जिल्हा कारागृहामधील जवळपास १३५ खेळाडू सहभागी झाले होते. विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह राजवर्धन यांच्या हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ झाला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत गोळाफेक, थाळी, भालाफेक, कुस्ती, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच अशा विविध स्पर्धा झाल्या. या क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सुनील राठोडनं पटकावला. तर महिला विभागात ठाणे मध्यवर्ती कारागृहातील उज्वला खेमनर यांनी हा मान पटकावला. तर प्रोत्साहनात्मक स्पिरीट ऑफ स्पोर्टसमनचे मानकरी ठरले भायखळा जिल्हा कारागृहातील विजय शिंदे. विजेत्यांना जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही वाय जाधव आणि पी पी जाधव यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली.
