ठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याचं आमदार डावखरेंचं आश्वासन

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात जादा पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधीकाधिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांची आवश्यक कामे उपकेंद्रातूनच होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. ठाणे उपकेंद्रात बीबीए, एलएलबी आणि बीएमएस, एमबीए अभ्यासक्रम सुरु असून 350 हून अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, बीबीए एलएलबी अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत होती. या मुद्द्यावरुन डावखरे यांनी काल उपकेंद्राला भेट दिली. तसेच उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्याबरोबर चर्चा केली. त्याचबरोबर इमारतीची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचे स्थलांतर, पात्रता आणि प्रवेश प्रक्रियेची आवश्यक कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया उपकेंद्रातूनच पूर्ण व्हायला हवी. अशी कामे झाल्यानंतरच उपकेंद्र उभारण्याचा उद्देश साध्य होऊ शकेल असे आमदार डावखरे यांनी सांगितले. या संदर्भात उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. सध्या बीबीए एलएलबी अभ्यासक्रमासाठी अवघे चार पूर्णवेळ शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. या ठिकाणी आणखी जादा पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन निरंजन डावखरे यांनी दिले.

Leave a Comment

%d bloggers like this: