ठाणेकरांचे आरोग्य सांभाळणा-या आरोग्य विभागाचे आरोग्य धोक्यात

ठाणेकरांचे आरोग्य सांभाळणा-या ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य धोक्यात आलं आहे. फायलेरिया विभागात विषारी धूर फवारणी करणा-या कर्मचा-यांना १२ महिन्यात अवघे २ मुखवटे देण्यात येत असल्यानं धूर आणि औषध फवारणी करणा-या कर्मचा-यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात ठाण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ठाणेकरांच्या आरोग्याची धुरा सांभाळणा-या आरोग्य विभागाला सध्या मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून तुंबलेली गटारं आणि साचलेल्या कच-यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. या डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत फवारणीचं काम केलं जातं. यासाठी १४० कर्मचारी काम करतात. मात्र ही विषारी फवारणी करताना कर्मचा-यांना त्यांचा जीव धोक्यात घालावा लागतो. कारण आरोग्य विभागाकडून या कर्मचा-यांना वर्षातून एकदाच मुखवटा दिला जातो. प्रत्यक्षात धूर फवारणी करताना दुस-या फवारणीसाठी नवीन मुखवटा देणं गरजेचं आहे. साचलेल्या पाण्यातील डेंग्यूच्या अळ्या मारण्यासाठी स्पेक्ट्रा हे अधिक विषारी औषध फवारावं लागतं तर धूर फवारणीसाठी पॅनेथ्रेम हे विषारी औषध तेलामध्ये मिसळून वापरावं लागतं. औषधांचे रासायनिक घटक कळत नकळत शरीरात गेल्यानं आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता कर्मचा-यांकडून व्यक्त केली जाते. याबाबत आरोग्य विभागातील जीवशास्त्रज्ञ डॉ. अंकुश राजमाने यांनी कर्मचा-यांना मुखवटे दिले जातात पण अनेकदा मुखवटे लावल्यामुळे कुत्री मागे लागण्याचा धोका असतो. म्हणून अनेकदा कर्मचारी मुखवटे लावत नाहीत असं सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: