जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी पालिका आयुक्त जिल्हाधिका-यांच्यात बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध विभागांशी संबंधित असलेली विविध प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत एका बैठकीचं आयोजन काल करण्यात आलं होतं.या बैठकीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा होण्यास मदत होणार आहे. कोपरी, नौपाडा येथील सर्व्हे क्रमांक १५८ हा भूखंड पार्कींगसाठी महापालिकेत हस्तांतरीत करणं, वागळे इस्टेट येथील सर्वे क्रमांक ५२० हा भूखंड ख्रिश्चन दफनभूमीसाठी हस्तांतरीत करणं, कळव्यातील सेक्टर क्रमांक ८ येथील सरकारी जमीन सर्व्हे क्रमांक १७ महापालिकेस हस्तांतरीत करणं आणि त्या बदल्यात ग्रामीण पोलीसांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. कळवा पूर्व पश्चिमेला जोडण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याकरिता मफतलाल कंपनीची जागा ठाणे महापालिकेस देण्याचा निर्णय झाला त्याचप्रमाणे डायघर रोड येथील भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. शीळ येथील जागा बुलेट ट्रेनसाठी असलेलं आरक्षण वगळून उर्वरित क्षेत्र महापालिकेस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. महिलांसाठी चालवण्यात येणा-या तेजस्विनी बस बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शासनास सादर करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

Leave a Comment

%d bloggers like this: