शासनानं प्लास्टीक बंदी जाहीर करूनही अनेक भाजी-फळ विक्रेते हलक्या प्रतीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरताना दिसत असून प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या ५ हजार कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप करण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या वतीनं हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड आणि वाघबीळ येथील विक्रेत्यांवर प्लास्टीक विरोधात धडक कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडील सर्व प्लास्टीकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी तयार केलेल्या कागदी पिशव्यांचे या विक्रेत्यांना वाटप करण्यात आलं. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे. जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपत सर्व विद्यार्थ्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होण्याकरिता महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं १० दिवसात जवळपास ८ हजार कागदी पिशव्या तयार करून घेण्यात आल्या आहेत. प्लास्टीकचा वापर कमी होण्यासाठी ठाणेकरांना या मोहिमेत सहभागी होता येणार आहे. ठाणेकरही या विशेष मुलांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या विकत घेऊ शकतात. जागृत पालक संस्थेच्या दिव्यांग मुलांकडून कागदी पिशव्या अत्यंत माफक दरात बनवून दिल्या जातात. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९८२०१ ८७७२१ या दूरध्वनीवर जयदीप कोर्डे यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
