जय मलंग श्रीमलंगच्या जयघोषात हर हर महादेवच्या गगनभेदी गर्जनेत हजारो शिवसैनिकांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन छेडलं. सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेल्या डोंगरावर नाथपंथीय मच्छींद्रनाथ बाबांची समाधी आहे. मूळ हिंदूंच्या असलेल्या या देवस्थानाबाबत कालांतरानं धार्मिक वाद निर्माण झाला. त्यामुळं तिथे हिंदूंची वहिवाट निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी मलंगगड आंदोलनाची सुरूवात केली. दिघे असताना या आंदोलनाला धार होती. मात्र आता हे आंदोलन म्हणजे निव्वळ उपचार राहिलं आहे. हजारो मलंगभक्त मलंगगड मुक्तीसाठी गडावर धडकले होते. मलंगगडावर असलेलं मलंग मच्छिंद्रनाथ मंदिर हे मूळचं हिंदूंचं देवस्थान आहे. माया मच्छिंद्रनाथांनी या स्थानावर अमरनाथांना दिक्षा दिल्यामुळं दिक्षास्थान म्हणून नवनाथांचं हे महत्वाचं स्थान आहे. हिंदूंच्या दुर्लक्षपणामुळं हे देवस्थान धोक्यात आलं आहे. मुसलमानांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर हे मंदिर सर्वधर्मीय स्थान असल्याचं न्यायालयानं घोषित केलं. मात्र शिवसेनेनं उच्च न्यायालयात केलेल्या दाव्यात हे देवस्थान सर्वधर्मीय स्थान नसून हिंदूंचं स्थान असल्याचा दावा केला असून या स्थानाला हिंदूंचं स्थान म्हणून मान्यता द्यावी अशी शिवसेनेची मागणी आहे. मलंग गडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीची विधीवत पुजा आणि घंटानाद आरती करुन मलंगगडावर माघी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेतर्फे समाधीवर भगवी शाल अर्पण करण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मलंगनाथाच्या समाधीची विधीवत पूजा करण्यात आली. गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पूर्वी आनंद दिघे असताना हे आंदोलन अतिशय जोरदार होत असे. अलिकडे मात्र हे आंदोलन म्हणजे निव्वळ उपचार ठरू लागलं आहे.
