चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तर त्याच्या भाऊ आणि बहिणीसह तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निकाल ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणेकर यांनी दिला असून सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. ही घटना जुलै 2012 रोजी घडली असून नवविवाहितेने विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यातच कळवा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गात आत्महत्या केली होती. कळवा-खारेगाव येथील प्रवीण शेट्टी याचा मे 2012 मध्ये कीर्ती हिच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. विवाहाची नवलाई संपताच मद्यपी प्रवीणचे एकएक कारनामे दिसू लागले. तसंच चारित्र्यावर संशय घेवून पती दररोज मारहाण करीत असल्याची तक्रार कीर्तीने माहेरच्यांकडे केली होती. तरीही नुकतेच लग्न झाल्याने थोडं सबुरीने घेवून सहन कर असा सल्ला पालकांनी दिल्याने कीर्ती सासरचा जाच सहन करीत राहिली. अखेर 29 जुलै 2012 रोजी तिने आई-वडिलांना फोन करून सासरी राहणे मुश्कील झाल्याची व्यथा मांडली. मात्र तरीही माहेरच्या मंडळीनी दुर्लक्ष केले. त्याचदिवशी पतीने फोन करून कीर्ती घरात नसल्याची माहिती माहेरच्यांना दिल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली असता कळवा रेल्वे स्थानकादरम्यान कीर्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांद्वारे देण्यात आली. त्यानुसार साक्षी-पुरावे पडताळून न्यायालयाने पतीच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे स्पष्ट करून प्रवीण शेट्टीला ३ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.
