युरोप तसेच विविध विदेशी स्थळांवर पर्यटनाला नेण्यासाठी बुकिंगची रक्कम स्वीकारून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील ट्रॅव्हल्स एक्स्प्रेस या पर्यटन कंपनीवर ठाण्यातील कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घोडबंदर रोडवरील वर्धमान वाटिका या इमारतीत राहणाऱ्या विणा लाड आणि त्यांचे पती कांतीलाल लाड यांना परदेशी फिरायला जायचे होते. यासाठी कांतीलाल यांचा कार्यालयातील मित्र अनिल पांचाळ यांच्या ओळखीच्या कांदिवलीतील ट्रॅव्हल्स एक्सप्रेस या पर्यटन कंपनीकडे लाड यांनी युरोपला जाण्यासाठी रक्कम भरली. मात्र व्हिसा न मिळाल्याने पर्यटन कंपनीच्या मालक मोनिका आशरपोटा आणि त्यांचे पती उमेश भाटीया यांनी त्यांना आशिया खंडातील देशात जाण्याचा पर्याय सुचविला आणि त्यासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे सांगून अतिरिक्त रक्कमही घेतली. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2018 रोजी पर्यटनाला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचलेल्या लाड आणि पांचाळ कुटुंबियांना विमानाची तिकिटेच काढली नसल्याचे आढळले. तब्बल दीड तास विमानतळावर थांबल्यानंतर कसेबसे हॉंगकॉंगला पोहचलेल्या पांचाळ आणि लाड यांना पुढील कुठलीही व्यवस्था नसल्याने स्वखर्चाने मायदेशी परतावे लागले. हा सर्व प्रकार ऑगस्ट ते डिसेंबर 2018 या कालावधीत घडला असून या दोन्ही कुटुंबियांची तब्बल 5 लाख 80 हजारांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
