गेल्या तीन वर्षातील वृक्षारोपण मोहिमेतील जगलेल्या झाडांची माहिती सादर करण्याचे वन सचिवांचे आदेश

आत्तापर्यंत झालेल्या वृक्षारोपण मोहिमेत किती झाडं जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारीपर्यंत वन विभागाच्या संकेतस्थळावर सर्व विभागांनी अपलोड करावी आणि पुढील वर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जनतेतून जास्तीत जास्त सहभाग कसा मिळेल याचं नियोजन करण्याच्या सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दिल्या. कोकण विभागाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत खारगे यांनी या सूचना दिल्या. ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी भूमी बँक तयार करणं, मार्च २०१९ पर्यंत रोपांसाठी खतं, माती भरून खड्डे तयार करणे, नद्यांच्या किना-यापासून १ किलोमीटर अंतरावर वन, शासकीय, खाजगी जमिनीवर वृक्षारोपण करणं, खाजगी क्षेत्रावर फळ, बांबू लागवडीस प्रोत्साहन देणं, सामाजिक वृक्ष लागवडीचा सहभाग मोठा असावा यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यावसायिक यांच्याशी करार करून त्यांना सहभागी करून घेणं अशा आशयाच्या सूचना विकास खारगे यांनी यावेळी दिल्या. १ कोटी व्यक्तींची हरीत सेना उभारण्यात येत असून त्यासाठीही २८ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या पालिकांनी त्यांच्या पाणी पुरवठा स्थळांवर त्रिपक्षीय करार करून मोठ्या प्रमाणात रोपं लावावीत असंही विकास खारगे यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: