गृहकर्जाच्या शोधात असलेल्या कुटुंबाला त्यांच्या परिचितानेच घातला लाखो रूपयांचा गंडा

सेवानिवृत्ती नंतर घर घेण्यासाठी गृहकर्जाच्या शोधात असलेल्या कुटुंबाला त्यांच्या परिचितानेच लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गृहकर्ज मिळवून देण्यासाठी बँकेत खाते उघडण्याच्या बहाण्यानं या भामट्याने २६ धनादेश आगाऊ घेत ४ लाख ८७ हजाराहून अधिक रक्कमेची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते ऑक्टोबर २०१७ या काळात घडला. खारटन रोड परिसरात राहणारे निवृत्त रेल्वे कर्मचारी प्रदीप म्हात्रे हे निवृत्त झाल्यानंतर गृहकर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या पत्नी जागृती यांच्या कामावरील त्यांच्या मैत्रिणीचा भाऊ रोहित परिहार याचा त्यांच्याशी परिचय झाला होता. त्याने म्हात्रे यांच्या कुटुबियांना भुलवून स्टेट बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी पती-पत्नीसह मुलांच्या बँक खात्याचे २६ कोरे धनादेश घेतले. वेळोवेळी विविध बहाणे करून विविध व्यक्तींना धनादेश देऊन त्याने ४ लाख ८७ हजार रूपयांची फसवणूक केली. याच दरम्यान परिहार याने त्यांच्या काकाची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्यानं म्हात्रे कुटुंबियांना शंका आली. त्यांना ३ वर्ष उलटूनही बँकेत खाते नाही की कर्जही मिळाले नाही त्यामुळे त्यांनी परिहार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. परिहार आता फरार असून त्याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: